वाघाने केली बैलाची शिकार
परिसरात वाघाच्या दहशतीचे शेतीकाम ठप्प
कुही:- तालुक्यातील मौजा चनोडा शिवारात शेतात बांधलेल्या बैलाची शिकार करत वाघाने ठार केले असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीने रब्बी हंगामातील कापूस काढणीसह इतर शेतकामे ठप्प झाले आहेत.

तालुक्यात संरक्षित वनक्षेत्रात कमी अन प्रादेशिक भागातच वाघांचा वावर वाढल्याने गावखेड्यांत ‘वाघोबा आला रे आला’ करत सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील चनोडा शेतशिवारात शेतकरी सदाशिव देवराव मेश्राम रा.वरंभा यांचे शेत असून नेहमी प्रमाणे शेतातील कामे आटोपून जनावरे शेतातच बांधून शेतकरी घरी परतले. व दुसर्या दिवशी (३० डिसेंबर) रोजी शेतात येऊन पाहिले बांधलेल्या जनावरांपैकी एक बैल दिसून आला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता नजीकच नागनदीच्या बाजूने बैल शिकार झाल्याच्या अवस्थेत दिसून आला. लागलीच याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागातर्फे लागलीच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून कॅमेरे बसविण्यात आले. आणि त्याच दिवशी वाघ पुन्हा शिकार केलेल्या ठिकाणी परत आल्याने वनविभागाच्या कॅमेरात टिपण्यात आला. त्यामुळे सदर बैलाची शिकार वाघानेच केल्याचे निष्पन्न झाले. शेतकरी सदाशिव मेश्राम यांचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (३० डिसे) ला चनोडा येथे वनविभागाच्या कॅमेरात वाघ दिसून आल्याने वाघ याच भागात असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील कापूस काढणीसह इतर शेतकामे ठप्प झाले आहेत. त्यात आज नवीन वर्षाच्या सावळी शिवारात आस्तिक पाटील यांच्या शेतात दुपारी १२ च्या सुमारास वाघ दिसून आला असून तेथीलच एका उसात गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागेश अतकरी यांनी सांगितले. परिणामी वाघाच्या दहशतीने मजूर शेतात कामाला जायला तयार नसल्याने शेतीकामे ठप्प झाले आहे.



