नापास होण्याच्या भीतीने विषारी द्रव्य प्राशन विद्यार्थ्याचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू
कुही :- शहरातील डेपो परिसरात बोर्डाच्या इयत्ता १० वी इंग्रजीच्या पेपरला जात असलेल्या विद्यार्थ्याने पेपरच्या भीतीने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला उपचारासाठी नागपूरला नेले असता नागपूर मेडिकल इस्पितळात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला.
आर्यन विजय लुटे (वय १७)रा.आकोली, ता.कुही असे विद्यार्थ्याचे नाव असून तो कुही शहरातील ऋख्खडाश्रम विद्यालयाचा विद्यार्थी होता.गतवर्षी मार्च २४ च्या शालांत परीक्षेत तो नापास झाला. शासनाच्या नियमानुसार त्याने एटिकेटी घेऊन तो इतर विद्यार्थ्याप्रमाणे इयत्ता ११वीत प्रवेश घेतला होता.परंतु त्याला दोन परीक्षेत मागे राहिलेल्या विषयात पास होणे गरजेचे असते. तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला होता परंतु पेपरच्या दिवशी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र परिसर पाण्याने व्यापून जाऊन नदी-नाले ओसंडून वाहत होते. त्यामुळे तालुक्याचा इतर गावांशी व उमरेड सारख्या शहराशी संपर्क तुटलेला होता.त्यामुळे उमरेड येथे परीक्षेस जाऊ शकला नाही.त्यामुळे त्याने अभ्यासात कच खाल्ली.आज त्याचा इयत्ता १०वीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. अभ्यास न झाल्याने व आपण उत्तीर्ण होणार नाही अशा भीतीने ग्रस्त असलेल्या आर्यन ने भीती मनात ठेवत आपण पुढे इयत्ता ११ वी तुन बाद होणार या भीतीने त्याने शहरातील डेपो परिसरात तांदूळ सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे विषारी द्रव्याची पुडी प्राशन केली. त्यावर त्याने गटागट पाणी प्याला.यातच त्याला काही वेळाने ग्लानी आली. म्हणून त्याला ग्रामीण रुग्णालय कुही उपचारार्थ भरती केले.

त्याच्या मित्राने ही बातमी त्याच्या घरी कळविली.माहिती मिळताच त्याचे वडील विजय लुटे व आकोलीचे माजी सरपंच गजानन धांडे हे कुही येथे आले. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल इस्पितळात रवाना केले.नागपूर मेडिकल इस्पितळात पोहोचताच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू आहे.


