स्फोटके निर्मिती कंपनीला ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग, मोठी दुर्घटना टळली

स्फोटके निर्मिती कंपनीला ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग, मोठी दुर्घटना टळली

नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील येनवेरा गावातील एसबीएल एनर्जी नावाच्या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला मोठी आग लागली. या आगीत दोन मशीन जळून राख झाल्याची माहिती आहे. ही घटना पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली.

आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटके बनविणाऱ्या कंपनीला लाग लागल्याची माहिती मिळताच काटोलचे सहायक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना ताजीच असताना दुसरी घटना घडल्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे काही मिनिटातच आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे इमारतीमध्ये असलेल्या मशिनलाही आग लागली.

अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. अमोनियम नायट्रेट हा पदार्थ ज्वलनशील असूनही जवळपास हजारांवर पिशव्या गोदामाच्या बाहेर ठेवल्या होत्या. हा प्रकार नियमबाह्य आहे. त्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणा या घटनेला जबाबदार असल्याची चर्चा आहे. पहाटेच्या सुमारास कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.