अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
पोलीस व महसूल विभागाची कारवाई
तालुक्यातील रेती घाट बंद असल्याने संधीचे सोने करण्यासाठी अनेक ट्रक व ट्रॅक्टर व्यावसायिकांनी छुप्या पद्धतीने नदी नाल्यांतून रेतीचा उपसा सुरू केल्याच्या उघड चर्चा सुरू होत्या. त्यामुळे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक ऍक्शन मोड मध्ये आले तर तिकडे वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांनीही अवैध धंद्यांविरुद्ध कंबर कसली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात महसूल व वेलतुर पोलिसांनी गस्त व पेट्रोलिंग वाढवल्याने अवैध रेती व्यावसायिकांना सडो की पळो करून सोडले आहे. त्यात आंभोरा पुलावरून होणारी अवैध रेती वाहतुकही ठप्प झाली असून अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे.
कुही:- दिवसागणिक तालुक्यात अवैध रेती उत्तखन करणार्यांवर वेलतुर पोलीस व महसूल विभागाने कारवाईचा जोरदार बडगा उचलला असल्याचे दिसून येते. बुधवारी पेट्रोलिंग करत असलेल्या महसूल विभागाने राजोला शिवारात नदीतून अवैधरित्या रेती उत्तखनन करत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे.
महसूल व पोलीस विभागाचे पथक गस्त घालत असताना बुधवारी तालुक्यातील राजोला शिवारात नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करत वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर ट्रॉली ला अडवडत परवाना विचारला असता सदर रेती अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक होत असल्याचे दिसून आले. महसुल विभागाने ट्रॅक्टर मालक प्रीतम शेंडे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार केला असून पुढील कारवाईसाठी ट्रॅक्टर वेलतुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदर कारवाई कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे , मंडळ अधिकारी आशिष धनविजय,तलाठी आनंद मस्के, विठ्ठल सुर्यवंशी मोहन पवार सह महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या कारवाईसाठी वेलतूरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.



