कुही तहसीलदारपदी अमित घाटगे यांची नियुक्ती
तालुक्याला गती व पारदर्शकतेची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा
(स्वप्नील खानोरकर-विशेष प्रतिनिधी)

कुही : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या आदेशानुसार श्री. अमित घाटगे यांची कुही तहसीलदारपदी पदस्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी ते नागपूर जिल्ह्यातील अपर तहसीलदार या पदावर कार्यरत होते. ते आता श्री. अरविंद हिंगे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या कुही तहसीलदार पदावर रुजू होणार आहेत.
सध्या प्रभारी तहसीलदारपदाची जबाबदारी श्री. विकास बक्कड यांच्याकडे होती. त्यांनी आपला कार्यभार अत्यंत जबाबदारीने आणि यशस्वीरित्या पार पाडत प्रशासकीय कामकाजात सातत्य ठेवले. त्यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यावर भर देण्यात आला. त्यांनी प्रशासन आणि जनतेमधील विश्वास टिकवून ठेवत तहसील कार्यालयाचा चेहरा जनाभिमुख केला.
कुही तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यापारी वर्ग नव्याने येणाऱ्या तहसीलदारांकडून आशेने पाहत आहेत. तहसील कार्यालय परिसरात दलाली, विलंब व अपारदर्शक प्रक्रियेला आळा बसावा, कामे वेळेत व्हावीत, व नागरिकांना सुलभ सेवा मिळावी, ही सर्वांची अपेक्षा आहे.
नागरिकांना तहसील कार्यालयात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामासाठी लागणारा अधिक वेळ, अपुरी व चुकीची माहिती मिळणे, काही कर्मचाऱ्यांचा नकारात्मक दृष्टिकोन, आणि प्रक्रियांची अपारदर्शकता हे सर्व अनुभवले गेले आहे. याशिवाय कार्यालया तंत्रज्ञानाचा अपुरा वापर, ,वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे ,लिंक फेल होणे, व किरकोळ चुका असतानाही नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागतात, यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत आहे.
श्री. अमित घाटगे हे प्रामाणिक, ठोस निर्णयक्षम आणि जनतेच्या हितासाठी कटिबद्ध अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यामुळे नागरिकांना विश्वास वाटतो की, त्यांच्या नेतृत्वात हे प्रश्न केवळ ओळखलेच जाणार नाहीत, तर त्यावर सकारात्मक पावलेही उचलली जातील.कुहीसारख्या ग्रामीण भागात तहसील कार्यालय हे प्रशासनाचे हृदयस्थान आहे. श्री. घाटगे यांच्या रूपाने या कार्यालयाचा चेहरा पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख बनेल, अशी आशा आहे. त्यांच्याकडून नागरिकांना न्याय, गती आणि सुविधा या त्रिसूत्रांवर आधारित प्रशासन अपेक्षित आहे. नागरिकांनी श्री. अमित घाटगे यांचे मन:पूर्वक स्वागत केले असून, त्यांच्या कार्यकाळात कुही तालुक्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

