अखेर कोकाटेंना रमीचा डाव भोवला, “कृषी” मंत्रीपदावरून व्हावे लागले पायउतार ; मुख्यमंत्री यांनी घेतला मोठा निर्णय

विधानभवनात ऑनलाईन रमी खेळणे माणिकराव कोकाटे यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मंत्रीपदाचा कारभार काढून घेतला आहे.

मुंबई: विधानभवनात ऑनलाईन रमी खेळणे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलेच भोवले आहे. आज त्यांच्याकडून कृषी विभागाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. माणिकराव कोकाटे यांना क्रीडा विभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी विभागाचा पदभार काढून घेतला आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर कृषी विभागाचा कार्यभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

विधान भवनात माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ऑनलाइन रमीच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना त्यांनी शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त विधान यामुळे विरोधकांनी देखील माणिकराव कोकाटेंवर टीका सुरूच ठेवली होती. विरोधकांकडून त्यांच्या राजीनामाची मागणी केली जात होती. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेल्याचे समोर आले होते. अखेर माणिकराव कोकाटे यांचे कृषिमंत्री पद काढून घेऊन त्यांना क्रीडा विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनाच्या सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ ट्विटर वर पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. ऑनलाइन रमी प्रकरणावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी केलेले वादग्रस्त अखेर त्यांना भोवले आहे.

दरम्यान याआधी देखील अनेकदा माजी  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या विधानांमुळे चर्चेत आले होते. मात्र तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. ऑनलाइन रमी खेळताना चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांच्या राजीनामेची मागणी केली जात होती.  सरकारने त्यांचं खाते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकार फक्त खाते बदल करून ऑनलाईन रमी व्हिडिओ प्रकरणावर पडदा तर टाकत नाहीयेना असा सवाल आता उपस्थित होत आहे.