पचखेडी बसस्टॉपवर प्रवाशांना कुणी निवारा देणार का निवारा ?
सत्ता मोठी, ग्रामपंचायत भारी ; तरी प्रवासी निवाऱ्याला वंचित सारी
स्वप्नील खानोरकर

कुही : नागपूर–आंभोरा रोडवरील पचखेडी बसस्टॉप हा तालुक्यातील मध्यवर्ती प्रवासी केंद्र पण दुर्दैव असे की, येथे प्रवाशांसाठी साधा निवारा देखील उपलब्ध नाही. रोज शेकडो प्रवासी, शालेय विद्यार्थी, महिला यांना उन्हातान्हात, पावसात आणि वादळवाऱ्यात रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. ही अवस्था तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठी ग्रामपंचायत असलेल्या पचखेडी गावाची आहे.
पचखेडी बसस्टॉपवरून परिसरातील १५ ते २० गावांतील लोक रोज तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस पकडतात. पण येथे निवारा नसल्याने कोणी रस्त्यावरच उभा राहतो तर कोणी हॉटेल, पानटपरी किंवा दुकानांच्या आडोशाला थांबतो. रस्त्यालगतच उभे राहिल्याने वाहनांच्या चाकाखाली सापडण्याचा धोका कायम प्रवाशांच्या डोक्यावर टांगलेला असतो. बसस्टॉपवर कोणीतरी टाकून ठेवलेले एक मोडकळीस आलेले बास बांबूचा टिनाच्या शेड उभे आहे. प्रवासी त्यालाच थोडाफार आसरा समजून थांबतात, पण ते कधी कोसळून कोणाच्या अंगावर पडेल याचा भरोसा नाही. त्या शेडमध्ये फक्त दोन, तीन बाकडे आहेत, त्यावर मर्यादित प्रवासी बसतात; उरलेले मात्र उन्हात व पावसात उभे राहून त्रास सहन करतात.
पूर्वी ज्या ठिकाणी बस निवारा होता, त्या जागेवर ग्रामपंचायतने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले. त्यामुळे बस थांबण्याची नेमकी जागाच गावकऱ्यांना माहित नाही. जिथे प्रवासी उभे राहतात, तिथे विटांचे तुकडे, घाण व कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. प्रवाशांना नाईलाजाने त्या अस्वच्छ जागेतच थांबावे लागते. या बसस्टॉपवर महिला प्रवासी व विशेषतः विद्यार्थिनींची फार मोठी गैरसोय होते. सुरक्षित व स्वच्छ ठिकाण नसल्याने त्यांना पावसाळ्यात भिजत उभे राहावे लागते, तर उन्हाळ्यात कडक उन्हात त्रास सहन करावा लागतो. हे चित्र लोकप्रतिनिधींना दिसत कसे नाही ?
बसस्टॉपवर काही प्रमाणात जागा प्रवाशांसाना निवाऱ्यासाठी देऊ शकतात मात्र कुणालाच ते सुचले नाही वा कुणाची मानसिकताच दिसत नाही. हे केवळ ग्रामपंचायत व परिवहन विभागाचे दुर्लक्ष नसून जनतेचा सरळ अपमान आहे. पचखेडी ही मोठी ग्रामपंचायत असून गावात सर्वच पक्षांचे वजनदार नेते आहेत. तरीही बसस्टॉपवर निवारा उभारण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. निवडणुकीच्या वेळी गावोगावी फिरून मत मागणारे लोकप्रतिनिधी आता या दुर्दशेकडे आंधळे–बहिरे का झाले आहेत, हा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
——————————————————————————————————————–
पचखेडी बसस्टॉपवर प्रवाशांची दुर्दशा सुरू आहे, पण लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांनवर झापडं बसली आहेत. ग्रामपंचायत मोठी, नेते वजनदार, पण साधा प्रवासी निवारा उभारायला कुणाकडे वेळ नाही. प्रवासी उन्हात भाजले, पावसात भिजले, धोक्यात उभे राहिले तरी कोणाला काही फरकच पडत नाही. हे विकासाचं नव्हे तर जनतेच्या सहनशीलतेचं थेट शोषण आहे. ग्रामपंचायतने निवाऱ्याच्या जागी स्वच्छतागृह बांधले, आता प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी जागाच नाही ? ही ग्रामपंचायत जनतेसाठी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी ? जोपर्यंत प्रवासी निवारा बनत नाही, तोपर्यंत गावकऱ्यांसोबत लढा कायम ठेवू, कारण हा लढा जगण्याचा, निवाऱ्याचा, सुरक्षिततेचा आहे.
सौरभदादा खांबाळकर, मनसे अध्यक्ष वेलतूर जि.प.सर्कल
———————————————————————————————————————


