इटियाडोह धरणावर दुर्दैवी घटना : बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालक गंभीर जखमी
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेले इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाचा विसर्ग बघण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. सायकांळी ५.३० वाजेच्या सुमारास नातेवाईकांसह पर्यटनाकरिता आलेल्या ४ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला.
लोकांची गर्दी असतानाही जवळपास १०० फुटपर्यंत जंगलाच्या दिशेने त्या बालकाला फरफटत नेले. मात्र उपस्थित पर्यटक व नागरिकांनी केलेल्या आरडाओरडीमुळे बिबट्याने त्या बालकाला सोडून पळ काढला. त्या जखमी बालकाचे नाव विहान भौतेष रॉय (वय ४) रा. दिनकरनगर ता. अर्जुनी मोर आहे. विहान हा काका अजय सरदार (वय २५ रा.दिनकरनगर) यांच्या सोबत इटियाडोह धरण बघायला आलेला होता. धरण बघून परत जात असतांना ऐन गर्दीचे ठिकाण असलेल्या विश्रामगृह जवळील परतीच्या रस्त्यावर काकाच्या हातात आपली करंगळी पकडून चालत असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट हल्ला चढवत पायाला पकडून ओढत नेले. लगेच सोबत असलेले अजय सरदार यांनी बिबट्याला परतून लावण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र पुन्हा बिबट्याने विहानला पकडून जवळपास १०० फुट जंगल परिसरात ओढत नेले.

दरम्यान अनेक पर्यटकांणी आरडा ओरड केल्यामुळे हल्लेखोर बिबट्याला परतून लावण्यात यश आले. या हल्यात चिमुकला विहान गंभीर जखमी झाला असून गळ्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे प्राथमिक उपचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.


