कुख्यात दुचाकीचोरास अटक; रुग्णांचा नातेवाईक असल्याचा भासवत करायचा गाडी चोरी
नागपूर : व्यसन भागविण्यासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल परिसरातून दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अजनी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वैभव गंगाधर वरुडकर वय ४१ रा. दिघोरी, असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. दारूचे व्यसन भागविण्यासाठी तो वाहनचोरी करायचा. वैभव हा रुग्णाचे नातेवाइक असल्याचे भासवून परिसरातील विश्रामगृहात थांबून रात्री रुग्णाच्या नातेवाइकांसोबतच जेवायचा व संधी साधून वाहन चोरी करीत होता.
एका आठवड्यात मेडिकलमधून दोन वाहने चोरी गेली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली असता दोन्ही वाहने वैभवने चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी विश्रामगृहात सापळा रचला, तो येताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून मेडिकलमधून चोरी केलेल्या पाच वाहनांसह सात दुचाकी वाहने जप्त केली. चोरीची वाहने गहाण ठेऊन मिळालेल्या पैशातून दारूचे व्यसन भागवित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याची पोलिस कोठडी घेतली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.



