देशी दारुच्या भट्टीमध्ये दारूचा ग्लास हातातून पडून फुटल्यामुळे ग्राहकाचा खून
नागपूर : वाडीतील दारुच्या भट्टीत आलेल्या एका ग्राहकाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडल्याने फुटला. एवढ्या किरकोळ कारणावरुन एका ग्राहकाचा दारू भट्टीवरील व्यवस्थापकाने आणि कर्मचाऱ्यांनी काठीने मारुन खून केला. सूरज सुभाष भलावी (२७, सोनबानगर वाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली.
सूरज भलावी हा बेरोजगार असून तो मिळेल ते काम करुन दारु पितो. वाडीतील खडगाव रोडवरील सायरे देशी दारुच्या भट्टीमध्ये तो रात्री दारु पिण्यासाठी गेला होता. दारु पीत असताना सूरजच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडून फुटला. त्या कारणावरुन दारुभट्टीचा मालक सूरजवर ओरडला. दारुभट्टीतील नोकर विशाल दिवेकर, रोहित वरखडे, संदीप चव्हाण, सुनील गोटे आणि प्रभाकर चिंतामणी यांच्यासह अन्य काहींनी सूरजला मारहाण केली. त्यानंतर त्याला उचलून एका खोलीत नेले आणि त्याला काठीने मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावर नेऊन फेकले. रात्रभर तो तेथेच तडफडत होता.

नागरिकांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पाच आरोपींना अटक केली. मात्र, दारुभट्टीच्या मालकाविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने संशय निर्माण झाला आहे.


