फार्महाऊसमधील मित्राचा बर्थडे पार्टीत स्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

फार्महाऊसमधील मित्राचा बर्थडे पार्टीत स्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

नागपूर : नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांढुर्णा गावात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान भीषण दुर्घटना घडली. गोल्डन व्हॅली फार्महाऊसमध्ये आयोजित केलेल्या एका खासगी पार्टीदरम्यान स्विमिंग पूलमध्ये बुडून प्रांजल नितीन रावले या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना  रात्री उशिरा घडली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल रावले हा त्याचा मित्र प्रशिक महेशकरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुमारे ८ ते १० मित्रांसह गोल्डन व्हॅली फार्महाऊसवर गेला होता. सायंकाळपासूनच पार्टी सुरू होती आणि रात्रीच्या सुमारास सर्वजण स्विमिंग पूलमध्ये उतरले होते. रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास प्रांजल पोहत असताना अचानक बुडू लागला. सुरुवातीला ही बाब लक्षात आली नाही, मात्र काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाल्यामुळे उपस्थित मित्रांनी शोध सुरू केला. त्यानंतर त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच  वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, वैद्यकीय अहवालानंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा तपास करत असून फार्महाऊसवरील सीसीटीव्ही फुटेज, उपस्थित मित्रांचे जबाब आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. ही दुर्घटना प्रांजलच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. एक आनंदाचा क्षण काही क्षणांतच दुःखात परिवर्तित झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या दुर्घटनेमागचं खरे कारण स्पष्ट होणार आहे.