शेतात काम करत असताना वाघाने पाठीमागून केला शेतकऱ्यावर हल्ला ; पत्नीसमोरच गेला पतीचा जीव     

शेतात काम करत असताना वाघाने पाठीमागून केला शेतकऱ्यावर हल्ला ; पत्नीसमोरच गेला पतीचा जीव     

नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात शनिवारी सकाळी नेऊरवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव रवी कवडु कालसर्पे (वय 38) असून तो सकाळी शेतात काम करत असताना वाघाने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांनी पोलीस आणि वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी कालसर्पे आणि त्याची पत्नी सकाळी ११ वाजता शेतात कामासाठी गेले होते. काही वेळाने त्याची पत्नी पाणी आणण्यासाठी शेजारील कालव्यावर गेली असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने रवीवर अचानक पाठीमागून हल्ला केला. वाघाच्या झडपेमुळे रवी गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. पत्नी परत आल्यानंतर तिला रवीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. या भयावह प्रसंगामुळे ती जोरजोरात ओरडू लागली, तिच्या आवाजामुळे वाघ तिथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस व वन विभागाच्या विरोधात जोरदार निषेध केला.

जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. यामुळे वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींबाबत स्थानिक लोकांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पथके तैनात केली असून, पिंजरा लावण्याची तयारी सुरू आहे. या घटनेनंतर सरकारने तात्काळ लक्ष घालून वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, तसेच बाधित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेने नेऊरवाडा गावासह संपूर्ण तालुक्यात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.