‘लुटेरी दुल्हन’ अखेर अटकेत ; नागपुरात महिलेने आठ पुरुषांसोबत लग्न करीत केली लाखोंची फसवणूक

‘लुटेरी दुल्हन’ अखेर अटकेत ; नागपुरात महिलेने आठ पुरुषांसोबत लग्न करीत केली लाखोंची फसवणूक

नागपूर : दीड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारी आणि समाजात ‘लुटेरी दुल्हन’ म्हणून कुप्रसिद्ध झालेली समीरा फातिमा अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. सिव्हिल लाईन्स परिसरात डॉलीच्या टपरीवर चहा घेत असताना गिट्टीखदान पोलिसांच्या विशेष पथकाने तिला अटक केली.

समीरा फातिमा हिच्याविरोधात मार्च २०२३ मध्ये पहिली तक्रार दाखल झाली होती. गुलाम गौस पठाण या ट्रॅव्हल व्यावसायिकाची फेसबुकद्वारे तिच्याशी ओळख झाली होती. महिलेने व्यावसायिकाला घटस्फोटित असल्याचं सांगितलं. त्यानंतर समीरा आणि व्यावसायिकाने लग्न केलं. पण लग्नानंतर सतत भांडण, खोटे आरोप आणि धमक्यांमधून ती पैसे उकळत राहिली. लाखो रुपये उकळल्यानंतर, तिने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला. त्यातही ती सेटलमेंटच्या नावाखाली मोठी रक्कम मागत होती. विशेष म्हणजे समीरा स्वतःला शिक्षिका असल्याचं सांगत होती आणि समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रिय होती. ती विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. “माझा घटस्फोट झालाय, मला तुमचा आधार हवा आहे,” अशा भावनिक क्लृप्त्यांनी ती पुरुषांची सहानुभूती मिळवायची. एकदा समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसला की ती त्यांच्याशी निकाह करून काही आठवड्यांतच भांडण उकरुन काढायची आणि नंतर खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन पैसे मागायची.

सध्याच्या तपासानुसार, समीराने आतापर्यंत किमान आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून एकूण ५० लाख रुपयांची आर्थिक लूट केल्याचं स्पष्ट झालं आहे. ती प्रत्येकवेळी ठिकाणं बदलत होती, पोलीस तपास चुकवत होती आणि कोर्टातील खटल्यांचा गैरफायदा घेत होती. तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे खटल्यांच्या माध्यमातून मोठ्या रकमा वसूल करून सेटलमेंट करणं होतं. पोलिसांनी या लुटेरी दुल्हनला अटक केली असून न्यायालयाने तिला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिच्या विरोधात आणखी फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करत आहेत.