शासकीय योजनेवर 50% अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्याची आर्थिक लूट ; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार दाखल

शासकीय योजनेवर 50% अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्याची आर्थिक लूट

शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार दाखल

( निखिल खराबे )
कुही:- दिवसागणिक आगळ्यावेगळ्या शक्कल लढवत काही भामटे सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करत रक्कम लुबाडल्याचे आपण अनेक प्रकरण पाहिले आहेत. मात्र एका व्यक्तीने चक्क शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे सांगत एका शेतकऱ्याची 33 हजार रुपयांची रक्कम लंपास केली असून फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने याची तक्रार वेलतुर पोलिसांत दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातुन राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याचे घोषित झाले असून वर्षभरापूर्वी या मार्गाचा सर्व्हे झाल्याचे बोलले जात आहे. तक्रारकर्ते यांच्या तक्रारीनुसार याच सर्व्हे दरम्यान सर्व्हे करणाऱ्या एका व्यक्तीने कुही तालुक्यातील राजोला येथील काही शेतकऱ्यांशी ओळख निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन केला. गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात सदर व्यक्तीने आपला मामा एका मोठ्या बँकेत उच्चपदस्थ असून त्याच्या माध्यमातून शासनाच्या एका 50% अनुदानावर असलेल्या योजनेचा लाभ आपण आपल्याला मिळवून देण्याचे सांगितले. शिवाय या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सुरवातीला 20 हजार भरायचे व तेही परत मिळणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या नातेवाईकाच्या माध्यमातून सदर इसमाने ही योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन करत 15 दिवसात योजनेचे पैसे मिळणार असल्याचे सांगुण शेतकऱ्याकडून पैसे मिळवले. मात्र पैसे देणार असल्याच्या दिवशी येतो म्हणून सांगत तेव्हापासूनच सदर व्यक्तीने मोबाईल फोन बंद करून ठेवला. अनेकदा फोन करूनही फोन बंदच दाखवत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर शेतकऱ्याने पोलीस स्टेशन गाठत योजनेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तिविरोधात वेलतुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विशेष म्हणजे या योजनेत त्या एकट्याचीच फसवणूक झाली नसून आणखी 4 ते 5 शेतकऱ्यांनाही लुबाडल्याचे बोलले जात आहे.