नागपुरात पुन्हा वाढली हुडहुडी
किमान तापमानाचा पार 8.8 अंशावर
नागपूर : हवामान खात्याने थंडीच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. परंतु, गुरुवारी बुधवारच्या तुलनेत किमान तापमानात 5.5 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवत थंडीने जोरदार पुनरागमन केले. गुरुवारी किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, नागपूरकर सकाळी व रात्री जॅकेटबंद दिसून आले. विशेष म्हणजे विदर्भात नागपूर सर्वात थंड शहर होते.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, 1 जानेवारीला थंडी वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट झाली. गुरुवारी सकाळी मात्र बुधवारच्या तुलनेत 5.5 अंश सेल्सिअसची घसरण होत किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावले. बुधवारी सायंकाळपासून नागपूरकरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला. गुरुवार यात शेकोटीची भर पडली. रात्रीच्या वेळी चौकांमध्ये शेकोटी पेटवून हात शेकणारे अनेकजण दिसून आले.
मागील महिन्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, 15 डिसेंबर रोजी किमान तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. या मोसमातील हे सर्वाधिक कमी तापमान होते. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोसमातील किमान तापमानाचा विक्रम मागे पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वात थंड होते.राज्यात पुन्हा थंडीची लाट वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे. परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.



