चोरी करताना रंगेहात पकडल्याने प्रवाशालाच बेदम मारहाण
रक्ताची उलटी झाली अन् क्षणात…
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात नागपुरात हादरवणारी घटना घडली. चोरी करताना रंगेहात पकडल्यामुळे चोरांनीच एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. यात तो निपचित होऊन खाली कोसळला. रक्ताची उलटी झाल्यानंतर तो शांत पडला. नंतर त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व घडत असताना इतर प्रवासी मात्र बघ्याची भूमिका घेत होते.

अंगाचा थरकाप उडवणारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणारी ही घटना दक्षिण एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये गुरूवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. शशांक राज (वय 25, रा. राजापूर, उत्तरप्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे. मो. फैयाज (19), सय्यद समीर (18), एम. शाम राव (21) आणि मो. अमान अकबर (वय 19, सर्व रा. सिकंदराबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेता लोहमार्ग पोलिस अधीक्षक प्रियंका नारनवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला.
- आरोपींना पकडून ठेवणे पडले महागात
शशांक कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहून डब्यातील प्रवाशांचा संयम सुटला. संतापलेल्या प्रवाशांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चारही आरोपींना पकडून ठेवले. महाराष्ट्रच्या बल्लारशा स्थानकावर गाडी पोहोचताच आरपीएफ जवान डब्यात चढले.
- आरोपींना केले पोलिसांच्या हवाली
आरपीएफ जवानांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून लोहमार्ग नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच लोहमार्ग पोलिस निरीक्षक गौरव गावंडे, पोलिस हवालदार संजय पटले, प्रवीण खवसे, अमोल हिंगणे, पुष्पराज मिश्रा, नोमीदास जिचकार यांच्यासह पोलिस पथकाने जनरल बोगीतील आरोपींना ताब्यात घेतले.
- पोलिस शिपायाचा नाकर्तेपणा
बोगीतील प्रवासी आणि मृताच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आंध्रच्या कागजनगर पोलिस ठाण्याच्या एका शिपाई त्याच कोचमधून प्रवास करत होता. मात्र, त्यानेही या घटनेकडे दुर्लक्ष केले आणि पळ काढला. त्या शिपायाने हिंमत दाखवली असती तर शशांकचा जीव वाचला असता. विशेष म्हणजे बेदम मारहाण केल्यानंतरही आरोपी त्याच बोगीत बसून होते.
- चारही आरोपी सराईत गुन्हेगार
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक शशांक आणि त्याचा मित्र कपील हे दोघेही धान कापण्यासाठी सिकंदराबादच्या पुढे ग्रामीण भागात गेले होते. तेथून कामाचे पैसे घेवून दोघेही 12721 दक्षिण एक्स्प्रेसने नागपूरसाठी निघाले होते. नागपुरातून ते मूळ गावी जाणार होते. आरोपीही त्याच डब्यात होते. चारही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास शशांक आणि त्याचा मित्र झोपेत होते.
- खिशातील पैसे चोरले अन् मोबाईलही
यादरम्यान आरोपींनी शशांकच्या खिशातील 1700 रुपये आणि कपीलच्या खिशातील मोबाईल चोरला. त्याच दरम्यान शशांकला जाग आली आणि त्याने आरोपींना रंगेहात पकडले. शशांक आरोपींना पैसे परत करण्याची विनवनी करू लागला. मात्र, आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवून जबर मारहाण सुरू केली. आरडा-ओरड झाल्याने इतर प्रवाशीही झोपेतून जागे झाले. मात्र, एकानेही त्याला वाचविण्यासाठी पुढे येण्याची हिंमत दाखवली नाही.



