वडेगाव येथे संत चरित्र आख्यान सप्ताहाचे आयोजन : संतांचे चरित्र्य हे जीवन जगण्यास उपयुक्त ; आठ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

वडेगाव येथे संत चरित्र आख्यान सप्ताहाचे आयोजन : संतांचे चरित्र्य हे जीवन जगण्यास उपयुक्त ; आठ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

कुही : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत झालेल्या प्रत्येक संतांचे चरित्र्य हे आज प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे, असे विधान हभप विदर्भरत्न अजय महाराज महाजन यांनी उपस्थित भाविक भक्त श्रोत्यांना उपदेश करताना मांडले. ते मांढळ जवळील वडेगाव येथील संकट मोचन हनुमान देवस्थान परिसरात आयोजित श्री संत चरित्र कथा आख्यान सप्ताहात बोलत होते. त्यांनी गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रातील संतांचे चरित्र आपल्या मधुर वानीतून संतांच्या कथा व चलचित्राद्वारे दाखवित संताविषयी प्रेमभाव व्यक्त करीत उपस्थितांना संताविषयी माहिती करून दिली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वडेगाव येथून मांढळ नगरीतील प्रमुख मार्गावरून पालखी, रामधून दिंडी काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक परिसरात रिंगण सोहळा करण्यात आला. यावेळी वडेगाव येथील हनुमान पंचकमेटी ने आयोजित केलेल्या या सप्ताहात दररोज सकाळी काकडा, रामधून काढून संपूर्ण गाव भक्तिमय करून टाकले. सकाळी ९ ते ११ व रात्री ८:३० ते १०:३० वाजेपर्यंत संत चरित्र कथेचे चलचित्राद्वारे भक्तिमय व मधुर वानीतून प्रवचन कथन झाले. दुपारी २ ते ४ च्या वेळेत विविध भजन मंडळाने भजने सादर केलीत. सायंकाळी ६ ते ७ च्या वेळेत हरिपाठ सादर करण्यात आला.

दु.१२:३० वाजता गोपालकाल्याचे कीर्तन प्रवचनकार ह.भ.प.विदर्भरत्न अजय महाजन प्रस्तुत केले. दहीहंडी फोडून गोपालकाला वितरित करण्यात आला. यानंतर दुपारी ५ वाजतापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.जवळपास आठ हजार भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी किसान क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर दंडारे, सामाजिक कार्यकर्ते लीलाधर धनविजय, बंडू वैद्य, परिसरातील सर्व गावांतील भाविक मंडळी, भजन मंडळ व नागरिक उपस्थित होते. हा सोहळा संपन्न करण्यासाठी माजी सरपंच जितू लुटे, पांडुरंग बुराडे, भागेश्वर फेंडर, उदाराम फेंडर, हनुमान पंचकमेटीचे सर्व सदस्य व संपूर्ण वडेगाव वासीयांनी सप्ताहाला सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहे.