नागपूर: तब्बल सहा महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या युवकास अटक  

नागपूर: तब्बल सहा महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या युवकास अटक  

नागपूर : वडिलाने दुसऱ्या महिलेशी संसार थाटला तर आईनेही दुसरे लग्न केले. त्यांची १२ वर्षीय मुलगी आईसोबत राहत होती. शेजारी राहणाऱ्या युवकाने तिच्याशी मैत्री केली. व सहा महिन्यांपर्यंत त्या मुलीचे लैंगिक शोषण केले. ती वडिलाच्या घरी गेल्यानंतर मुलगी चोरुन फोनवर बोलताना दिसल्यामुळे त्यांनी आस्थेने चौकशी केल्यानंतर तिने प्रियकराचे नाव सांगितले तसेच लैंगिक शोषणाबाबतही वडिलांना माहिती दिली. दोघांच्या प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकराला अटक केली. अमित सुखदेव इंगळे (२०, रा. जरीपटका) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

जरीपटका परिसरात राहणाऱ्या स्विटीच्या (बदललेले नाव) आई-वडिलांचे आपसात पटत नसल्याने त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. स्विटी ही अधून-मधून वडिलांकडे ये-जा करते. अमित इंगळे हा स्विटीच्या घराच्या शेजारी राहतो. तो बीए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. तर स्विटी ही सहाव्या वर्गात शिकत आहे. शेजीरीच राहत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. त्याने तिच्या अजानतेपणाचा गैरफायदा उचलत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्विटीची आई कामाला गेल्यानंतर अमित तिच्या घरी यायचा. त्याने स्विटीला मोठी झाल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून जवळपास सहा महिने लैंगिक शोषण केले.

गेल्या आठवड्यात स्विटी ही वडिलांकडे मुक्कामी आली. यावेळी, ती घरात मोबाईलवरुन चोरून बोलत असताना वडिलांना दिसली. त्यांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने प्रियकर अमितसोबत प्रेमसंबंध आणि लग्न करणार असल्याचे सांगितले. हे ऐकताच वडिलांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी मुलीसह जरीपटका पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमितविरूद्ध कलम ६४ (१), ६५ (२), ३५१ (२) भान्यासं, सहकलम ४, ६, ८, १०, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपी युवकाला अटक केली.