वर्दीधारी पोलिसाने फोडली कारची काच ; रिव्हर्स घेताना बाईकला दिली होती धडक

वर्दीधारी पोलिसाने फोडली कारची काच ; रिव्हर्स घेताना बाईकला दिली होती धडक

नागपूर: शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरात सायंकाळी एका वर्दीधारी पोलिसाने नागरिकाच्या कारची काच फोडल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपूर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी राजकुमार कनोजिया असून, तो अंबाझरी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहे. रात्री एका कार चालकाने त्याची कार रिव्हर्स घेत असताना राजकुमार कनोजिया यांच्या वाहनाला टक्कर लागली. या अपघातानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. राजकुमार कनोजियाने रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड उचलून कारच्या काचा फोडल्या.

या घटनेचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, काहींनी हा प्रसंग आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने स्वतःच कायदा हातात घेतल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेच्या पुढील तपासाबाबत पोलीस खात्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेने नागपूर पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.