विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
नागपूर : विदर्भात मंगळवारपासून सुरू झालेला हवामानातील बदल अजूनही कायम आहे. जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मूसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी मध्यरात्री उपराजधानीत वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाने थैमान घातले. तर बुधवारी सायंकाळी देखील वादळी वाऱ्यासह मूसळधार पाऊस कायम होता. गुरुवारी पहाटेपासून पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भातील वर्धा, भंडारा आदी जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
नागपूरच्या अनेक भागात सकाळपासूनच मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागात वादळी वारा आणि विजांचा कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना छत्री व रेनकोटचा आधार घेऊनच बाहेर पडावे लागले. दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळासह गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आतापर्यंत नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या तीन दिवसांत उपराजधानीसह संपूर्ण विदर्भातच हवामान पूर्णपणे बदलले आहे. बुधवारी संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भासह काही भागात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे


