माजी आमदार राजू पारवे यांच्या मध्यस्थीने बेमुदत उपोषणाची सांगता
कुही:- तालुक्यातील मौजा आंभोरा खुर्द येथील लाभक्षेत्रातील शेतजमिनीत जाण्यासाठी आंभोरा ते गोन्हा तयार करण्यात आलेल्या रस्त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तेथील ऋषी भोंगाडे व इतर नागरिकांनी केला होता. त्याची उचस्तरीय चौकशी करण्याची आपली मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. माजी आमदार राजू पारवे यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्यांना 25 दिवसात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देत उपोषण सोडवले आहे.
तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाबाधित व लाभक्षेत्रात शासनातर्फ़े मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र यातील अनेक कामांत अनियमितता होत असल्याच्या अनेक चर्चा उघडपणे सुरू आहेत. यात गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर कार्यालयामार्फत मौजा आंभोरा (खुर्द) येथील लाभक्षेत्रातील शेतजमिनीत जाण्यासाठी आंभोरा ते गोन्हा गावादरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र सदर रस्ता कामात संबंधित कंत्राटदार यांच्याकडून भ्रष्टाचार करण्यात आला असून कामात अनियमितता असल्याचा आरोप आंभोरा खुर्द येथील स्थानिक ऋषी भोंगाडे व ग्रामस्थ यांनी केला आहे. मात्र अनेकदा तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याने आज महाराष्ट्र दिनी आंभोरा खुर्द येथे आमरण उपोषण सुरू केले. यात रस्ता कामात झालेल्या अनियमिततेची उचस्तरीय तांत्रिक चौकशी करण्यात यावी, संबंधित कंत्राटदार व यात सहभागी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई होऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या त्यांनी लावून धरल्या.

उपोषणाची माहिती मिळताच माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ पारवे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणस्थळी ग्रामस्थांसोबत तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह सविस्तर चर्चा केली. या चर्चेत शासन स्तरावरून आवश्यक त्या चौकशी प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले. तसेच २५ दिवसांच्या आत या मागणीचा न्याय्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानंतर पारवे यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांच्या हस्ते ज्यूस स्वीकारून आमरण उपोषण समाप्त केले.


