बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणाऱ्या १९ वर्षांच्या मुलांना पोलिसांनी केली अटक

बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणाऱ्या १९ वर्षांच्या मुलांना पोलिसांनी केली अटक

नागपूर : नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन तरुणांना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली. संशयास्पद दुचाकी थांबवून झडती घेतली असता एक पिस्तूल, चिनी चाकू, स्टीलची कुऱ्हाड आणि रोख रक्कमसह एकूण ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या तरुणांची ओळख अमय अमृतलाल धुर्वे आणि कमलेश राजेश राऊत (दोघेही वय १९) अशी झाली आहे.

काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवर दोन तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी परिसरात नाकाबंदी लावली. दुचाकी थांबवून झडती घेतली असता आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, धारदार चिनी चाकू, स्टीलची कुऱ्हाड, १०,००० रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ८३,५०० रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ९८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी शस्त्रे कुठून मिळवली, याचा खुलासा केला नसला तरी पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात शस्त्र पुरवठा साखळीचा तपास करण्यात येत आहे. दोघे तरुण कोणत्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरत होते, याचा तपास पोलिसांच्या गुप्तचर विभागाद्वारे केला जात आहे.