बहिणींच्या गर्दीने फुलले कुहीचे तहसील

बहिणींच्या गर्दीने फुलले कुहीचे तहसील!

उत्पन व रहिवाशी प्रमाणपत्रांसाठी दोन दिवसांमध्ये हजारांवर अर्ज!

(भास्कर  खराबे)

कुही  :-  ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी कुहीचे तहसील लाडक्या बहिणींच्या गर्दीने फुलून गेले. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी उत्पन व रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक असून यासाठी दोन दिवसांमध्ये जवळपास  हजारांवर अर्ज तहसील प्रशासनाकडे आले आहेत. दरम्यान गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी तहसील परिसरात दलालांची टोळी सक्रीय झाल्याने अनेक लाडक्या बहिणींना दलाल भाऊरायाला ओवाळणी टाकावी लागत असल्याची जोरदार चर्चा आहे.

दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली. १ ते १५ जुलैपर्यंत फॉर्म भरून घेण्याची प्रक्रियाही चालू केली. आता या योजनेसाठी लागणारे उत्पन्नाचे व अधिवास प्रमाणपत्रे काढण्यासाठी बहिणींची प्रचंड गर्दी तहसील परिसरात झाली आहे. तहसील आवारात अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही.

उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी कुही तहसील आवारात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही कागदपत्रे काढण्यासाठी तलाठ्याचीही सही लागते. ती मिळविण्यासाठी बहिणी अक्षरशः त्या कार्यालयावर तुटून पडल्या आहेत.

मुख्यमत्री लाडकी बहीण योजना महिलांना महिना १५००/- रूपये मिळणारी योजना महिला व बालकल्याण विभागाची आहे. १ जुलैपासून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रियाही चालू केली आहे. त्या योजनेसाठी उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढण्याचे असल्याने तहसील कार्यालय परिसरात अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती.

———————————

दलाल दिसताच तात्काळ संपर्क साधा

उत्पन्न प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र अथवा इतर कोणतेही प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणी दलाल भेटून पैशाची मागणी केल्यास किंवा कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रात रितसर फी पेक्षा अधिकच्या पैशाची मागणी केल्यास कुही  तहसील कार्यालयाशी तात्काळ संपर्क करावा. निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तात्काळ कारवाई करू असे तहसीलदार शरद कांबळे  यांनी  सांगितले.