HSRP नोंद करण्याची मुदत संपली ; आता कारवाई, आरटीओची माहिती

HSRP नोंद करण्याची मुदत संपली ; आता कारवाई, आरटीओची माहिती

नागपूर : राज्य परिवहन विभागाच्यावतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंदणीच झाली नाही. ३१ डिसेंबरची डेडलाइनही आता संपली आहे, त्यामुळे आता कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठीची अंतिम मुदत पूर्वी ३१ मार्च २०२५ होती, त्यानंतर ३० जून २०२५ करण्यात आली. त्यानंतर १५ ऑगस्टपरर्यंत नंबर प्लेट बदलविण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशी डेडलाइन वाढविण्यात आली. मात्र अद्यापही नागपूर जिल्ह्यात १३ लाखांपेक्षा अधिक वाहनांनी नवीन नंबरप्लेटसाठी नोंदणीच केली नाही, त्यामुळे या वाहनांवर आता परिवहन आयुक्तांच्या सूचनांनंतर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) यांनी सांगितले. एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत ज्यांनी नोंदणी करून वेळ निश्चित केली, त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

एचआरपीएस न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा उतरविणे आदी कामे थांबविण्यात येईल. वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतणीकरण ही कामेही होणार नाही, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. वाहनांची संख्या अधिक असल्याने पुन्हा मुदत वाढविण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.