यंदा उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता; फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागल्या उन्हाच्या झळा
गेल्या आठवड्याभरापासून दुपारी ऊन वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानात 2.6 अंशाने वाढ झाली असून, किमान तापमानात 4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. फेब्रुवारीमध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने उन्हाळ्यातील एप्रिल, मेमध्ये काय स्थिती असेल, याचा अंदाज लावत नागरिकांना अक्षरश: ‘घाम फुटला’ आहे. गेल्या आठवड्याभरापासून कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ झाली असून, सकाळपासूनच ऊन वाढत आहे. दुपारी अक्षरशः घाम निघत आहे.

गेल्या आठवड्याभरापासून दुपारी ऊन वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानात 2.6 अंशाने वाढ झाली असून, किमान तापमानात 4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. शहरातून थंडी हद्दपार झाली असून नागरिकांना घरांमध्ये पंखे पूर्ण गतीने सुरू करावे लागत आहे. दुपारच्या वेळी आता नागरिकांना मफरलऐवजी दुपट्टा, स्कार्फ घालून निघावे लागत आहे.
हाताला उन्हाचे चटके लागत असल्याने मुली सनकोट घालून दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज शहरात कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस होते.



