डांबराच्या ट्रकला मागून जबर धडक
चालकाचा जागीच मृत्यू
कुही :- पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येणाऱ्या कुही फाटा येथे डांबराच्या ट्रकला पाठीमागून जबर धडक देणाऱ्या 22 चाकी ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 चाकी ट्रक ट्रेलर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

फिर्यादी संदीप गायकवाड, रा. पाचगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ते आपल्या मालकीचे ट्रक क्रमांक एमएच 40 वाय 4372 याने सुरगाव येथील प्रेम साई डांबर मिक्सर कंपनीतून ट्रकमध्ये डांबर भरून नांद येथील रस्ता डांबरीकरण कामावर घेऊन जात होते. दरम्यान सकाळी 8.30 च्या सुमारास नागपूर उमरेड मुख्य मार्गावरील कुही फाटा पुलियाच्या 300 मिटर अंतरावर गाडी उमरेडच्या दिशेने असताना मागून येणाऱ्या 22 चाकी ट्रक ट्रेलर क्रमांक आर जे 11 जीसी 3955 याने पाठिमागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मागून धडक देणारा 22 चाकी ट्रक ट्रेलरचा कॅबिन तुटून डांबराच्या ट्रकच्या मागल्या भागात फसला. या अपघातात 22 चाकी ट्रक ट्रेलरचा चालक नामे धर्मेंद्रसिंग शत्रुघ्नसिग गोरमी (वय 36) रा. त्रपेकापुरा,भिंड,मध्यप्रदेश याचे दोन्ही पाय केबिनमध्ये फसले होते. लागलीच याची माहिती कुही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच जेसीबी व हायड्रा च्या मदतीने त्याला बाहेर काढले. मात्र स्टेअरिंग चा छातीला जबर मार लागल्याने व धडक दिलेल्या ट्रकमधील डांबर त्याच्या अंगावर पडल्याने त्याचे शरीर भाजल्या गेले. यातच त्याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला आहे. 22 चाकी ट्रक ट्रेलरचा चालक मृतक धर्मेंद्रसिंग शत्रुघ्नसिग गोरमी याने त्याच्या ताब्यातील ट्रक ट्रेलर निष्काळजीपणे व भरधाव चालवत डांबरच्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने त्याच्या मृत्यूस तोच कारणीभूत ठरला आहे. फिर्यादी याचे तक्रारीवरून कुही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरीचंद्र इंगोले करीत आहेत.


