सायबर चोरट्यांना विकलेल्या बँक खात्यातून दीड कोटींची उलाढाल ; आरोपी महिला अटकेत

सायबर चोरट्यांना विकलेल्या बँक खात्यातून दीड कोटींची उलाढाल ; आरोपी महिला अटकेत

नागपूर : सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक केल्यावर हे पैसे इतर विविध ठिकाणच्या खात्यात वळविले जातात. त्यानंतर त्या खात्यातील पैसे ठकबाज काढून घेतात. नागपुरातील एका महिलेने अशात प्रकारे आपले खाते सायबर चोरट्याला खाते वापरण्यासाठी देत, त्यातून दीड कोटींचे व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सना शाहिद खान (रा. मायानगर, इंदोरा) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्याने एका व्यक्तीची ५० लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामध्ये सना खान यांच्या खात्यातून व्यवहार झाल्याची माहिती समोर आली. सायबर पोलिसांनी नागपुरातून सना खान हिला २६ एप्रिलला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची पोलिस कोठडी मिळवित तपास सुरू केला. तेव्हा तिच्या खात्याची माहिती घेतली असता, आणि बिहार येथून त्या खात्यामध्ये विविध खात्यातून जवळपास दीड कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उजेडात आले. दरम्यान याच पैशातून तिने नेपाल आणि बिहारमध्ये वास्तव्य केले होते. सध्या सना खान ही कारागृहात असून पोलिस तपास करीत आहेत.

सना खानने बिहारमधून सुरू असलेल्या फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवरून अनेकांना फसवणुकीसाठीही फोन केले. त्यातून सना खानने अनेकांची पैसे आपल्या खात्यात पैसे वळविल्याची माहिती आहे.पोलिसांकडून बिहारमधून सुरू असलेल्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रीय असलेल्या सनाच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाले आहे. विशेष म्हणजे, जामताराप्रमाणेच बिहारमधूनही सायबर चोरट्यांकडून कॉलिंग सेंटरच्या माध्यमातून फसवणुकीचे मोठे रॅकेट सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.