सासरच्यांकडून हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ ; लग्नानंतर महिनाभरात आयुष्य संपविले
नागपूर: बुटीबोरी परिसरात सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका नवविवाहितेने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची अत्यंत वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. मयुरी ठाकरे डाहुले (वय 26) या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिचा विवाह 25 एप्रिल 2025 रोजी अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
मयुरीचा विवाह नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या अभिषेक डाहुलेशी झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र, काहीच दिवसांत सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला. तिची सासू कुसुम डाहुले, सासरे दीपक डाहुले आणि दीर आदित्य डाहुले यांनी सतत पैशांसाठी मयुरीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. नवरा अभिषेक डाहुले यानेही या छळाला पाठिंबा दिल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. शारीरिक आणि मानसिक छळामुळे मयुरी अत्यंत तणावात होती. तिने सुरुवातीला आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती आपल्या वडिलांना दिली नव्हती, मात्र, छळ न थांबल्यामुळे तिने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. वडिलांनी मदतीचा हात पुढे करत गटाच्या भीशीतील 20 हजार रुपये सासरच्या मंडळींना दिले, मात्र त्यानंतरही छळ थांबला नाही.

अखेर सहनशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या छळाला कंटाळून मयुरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मयुरीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अभिषेक डाहुले, सासू कुसुम डाहुले, सासरे दीपक डाहुले आणि दीर आदित्य डाहुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत.

