पोलीस अमलदाराचा मृत्यू ; तालुक्यात सर्वत्र हळहळ
कुही :- शनिवारी पोलीस अमलदाराचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. शनिवारी या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर पोलीस अमलदार हा तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता.
अजय पतीराम झाडे (वय-३४) असे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पोलीस अमलदाराचे नाव आहे. अजय हा कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता. शनिवारी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलीस स्टेशन नजीकच असलेल्या खोलीवर आराम करण्यासाठी गेला होता. अजय बराच वेळापासून दिसला नाही व त्याची प्रकृती बरी नसल्याने सहकाऱ्यांनी खोलीवर जाऊन शहानिशा केली असता अजय बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. लागलीच त्याला वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. व तेथून कुही येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. कुही येथील डॉक्टरांनी अजय याला तपासून मृत घोषित केले. अजयचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून रविवारी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून त्याचे पार्थिव चिमूर येथे पाठवण्यात आले आहे. अजय हा पोलीस खात्यात २०१४ पासून अमलदार पदावर रुजू झाला होता. व सध्या वेलतूर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. अजयच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



