बँकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकऱ्याने घेतला गळफास

बँकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकऱ्याने घेतला गळफास

जलालखेडा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र गेल्या काही वर्षापासून सुरू असून जलालखेडा येथे एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश नामदेव कळंबे (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गणेशने शेतीसाठी भारतीय स्टेटस बँक जलालखेडा येथून ७३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज भरणे शक्य होत नव्हते. त्यामुळे गणेश नेहमी चिंतेत असायचा. सततची नापिकी व शेतमालाला भाव नसल्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा मोठा प्रश्न गणेश समोर पडला होता. कर्जामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गणेश कळंबे हा अत्यंत मेहनती तरुण शेतकरी होता. त्याच्याकडे दीड एकर शेती आहे. घरातील सर्व झोपल्यावर तो घरातील अंगणात आला. त्याने बाहेरून दरवाजा बंद केला व अंगणातील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला जेव्हा जाग आली तेव्हा गणेश तिला घरात दिसला नाही. ती लगेच घराबाहेर यायला लागली तर दरवाजा बाहेरून बंद होता. खिडकीतून तिने बघितले असता तिला गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने लगेच घराचा बाजूला राहणाऱ्या चुलत दीराला फोन केला. तो लगेच तिथे आला व त्याने दरवाजा उघडला. शेजारच्यांना बोलावले व घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिस लगेच घटनास्थळी पोहचले. गणेशला उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून गणेशला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठवले. पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जलालखेडा पोलिस करत आहे.