वैनगंगा नदीत तरंगणाऱ्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली ; २ दिवसापासून घरून होता बेपत्त्ता

वैनगंगा नदीत तरंगणाऱ्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली ; २ दिवसापासून घरून होता बेपत्त्ता

कुही: बुधवार ३ सप्टेंबर रोजी अंभोरा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात सकाळी आढळलेल्या अनोळखी मृतदेहाने परिसरात एकच खळबळ उडाली. तपासाअंती मृतदेहाची ओळख पटली असून तो आवारमारा येथील शैलेश एकनाथ धारगावे वय ४३ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंभोरा येथील वैनगंगा नदीत स्थानिकांना सकाळी मृतदेह तरंगताना दिसल्याने वेलतूर पोलिसांना कळविण्यात आले. तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन स्थानीकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहावरील कपड्यांवरून आणि मिळालेल्या माहितीनुसार तो दोन दिवसांपूर्वी बेपत्ता शैलेश धारगावे यांचा असल्याचे पोलिसांना संशय आला. शैलेश हे १ सप्टेंबर रोजी पहाटे घराबाहेर पडले होते, त्यानंतर ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कुटुंबीयांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांनी मृतदेह पाहून तो शैलेशचाच असल्याची खात्री दिली.

या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी वेलतूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.