विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं : अपहरण करुन अत्याचार ; आरोपी युवक अटकेत

विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं : अपहरण करुन अत्याचार ; आरोपी युवक अटकेत

नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अपहरण करून विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर पोलिस कोठडीतून फरार झालेल्या आरोपीला हिंगणा पोलिसांनी चाळीसगाव येथे अटक केली. गणेश भिकन गोसावी (वय २०, रा. विखरन, ता. एरंडोल, जि. जळगाव) असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. तो मालवाहू वाहनावर चालक आहे.

प्राप्त माहितीनुसार, १७ वर्षीय मुलगी बारावीत शिकते. दीड वर्षांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर गणेशसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. नोव्हेंबर महिन्यात गणेशने तिचं अपहरण केलं. तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशला अटक केली. पीडित मुलीला नातेवाइकांच्या स्वाधीन केलं. १० जुलैला गणेशने पुन्हा तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी घरी परतली. नातेवाइकांना घडलेली घटना सांगितली. नातेवाइकाने हिंगणा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अपहरण व बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. हिंगणा पोलिसांनी ३० ऑगस्टला गणेश याला मध्यप्रदेशातील धार येथील पिथमपूर येथून अटक केली. त्याला नागपुरात आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

यादरम्यान पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला हिंगण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गणेश तेथून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश हा चाळीसगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने हिंगणा पोलिसांनी सापळा चरून त्याला अटक केली. त्याला नागपुरात परत आणलं.