मांढळ येथील श्री शिव व हनुमान मंदिरात ​घुमला ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर ; गोपाळकाला व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा

मांढळ येथील श्री शिव व हनुमान मंदिरात घुमला गोविंदा रे गोपाळाचा गजर ; गोपाळकाला व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा

कुही : श्री शिव व हनुमान मंदिर घुमडवार चौक मांढळ येथे काकडाच्या निमित्ताने ‘गोपालकाला’ व दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. परिसरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण मांढळ नगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

​भक्ती आणि शक्तीचा संगम ​दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घुमडवार चौक मित्र मंडळ आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. आदल्या दिवशी शनिवार, दि.३ जानेवारी दुपारी ४ वाजता स्थानीय महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी ६ वा. नंतर भगवान शिवाची लिंगपिंड व हनुमानाच्या मूर्तीची पूजा आणि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध भजन मंडळींनी भजनसंध्याचा कार्यक्रम रात्री १ वाजेपर्यंत प्रस्तुत केला. दुसरे दिवशी दु.१२ वा. महादेवाचा अभिषेक, पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर हभप. विजय सेलोकर महाराज यांनी गोपालकाल्याचे कीर्तन सादर केले. ​दहीहंडी फोडून उपस्थितांनी गुलाल व फुलांची उधळण करित आनंद साजरा केला. व गोपालकाल्याची सांगता महाआरतीने करण्यात आली.​ ​दहीहंडीनंतर भाविकांना पारंपरिक ‘काला’ (प्रसाद) वाटप करण्यात आला. सायंकाळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमा निमित्ताने घुमडवार चौकात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. ​”आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी हा उत्सव आम्ही एकजुटीने साजरा करतो,” अशी भावना आयोजक प्रदीप घुमडवार यांनी यावेळी व्यक्त केली.