Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

कळमना येथील पार्वतीनगरात दारू पिताना झालेल्या वादातून प्रेयसीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने टोळक्याने चाकू व रॉडने हल्ला केला. यात २२ वर्षीय ऋतिक पटलेचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.

  • दारू पिण्यानंतर पैशांवरून व प्रेयसीवरील टिप्पणीमुळे वाद वाढला
  • वडील-मुलांसह ५ आरोपी अटकेत; एक अल्पवयीन ताब्यात
  • चाकू व रॉडने हल्ला; परिसरात दहशतीचे वातावरण

नागपूर: प्रेससीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या केली, तर इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तरुणांमध्ये वाढते दारूचे व्यसन आणि त्यातून घडत्त असलेल्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी या हत्याकांडात ५ जणांना अटक केली तर अल्पवयीनला ताब्यात घेतले, ऋतिक सावनलाल पटले (२२) रा. पार्वतीनगर, आजरी-माजरी असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये ईशा हातिम अंसारी (५५), त्याची मुले मुस्तफा उर्फ गोलू अंसारी (२८), लुकमान अंसारी (२२), साहिल अंसारी (२०), सलाउद्दिन अंसारी (१९) आणि एका अल्पवयीनचा समावेश आहे. जखमी तनसू शिवप्रसाद नागपुरे (२३), सलीम अंसारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भांडणापूर्वी सोबत बसून ढोसली दारू

ऋतिक पटले हा त्याचा मित्र तनसू नागपुरेसोबत घराबाहेर बसून बोलत होता, या दरम्यान परिसरातील त्यांचा मित्र मुस्तफा उर्फ गोलू तेथे आला. त्याने दोघांनाही दारू पिण्यासाठी सोबत येण्यास म्हटले. पैसे नसल्याने दोघांनीही नकार दिला. त्यानंतरही मुस्तफा दोघांनाही आपल्या दुचाकीवर बसवून बिनाकी मंगळवारीच्या कांजी हाऊस चौकात घेऊन गेला, तेथे तिघांनीही दारू ढोसली, परतताना ऋतिक आणि मुस्तफामध्ये पैशांवरून वाद झाला. यादरम्यान ऋतिकने त्याला चिडवण्यासाठी प्रेयसीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे मुस्तफा संतापला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दोघांनाही रस्त्यातच उतरवून निघून गेला, मात्र हा वाद येथेच संपला नव्हता.

चाकू, रॉडने केले वार

घरी परतल्यानंतर मुस्तफाने त्याचा भाऊ लुकमान याला ऋतिकसोबत झालेल्या वादाची माहिती दिली. लुकमानने तनसूला फोन करून शिवीगाळ केली. वाद मिटविण्यासाठी ऋतिक आणि तनसू त्यांचा मित्र सलीम अंसारी याच्यासोबत पार्वतीनगर चौकात पोहोचले. मात्र वाद मिटण्याऐवजी आणखी विधळला, हाणामारी सुरू होताच मुस्तफा, लुकमान, साहिल, सलाउद्दिन, त्याचे वडील ईशा व एका अल्पवयीनने तिघांवरही हल्ला चढविला.