लाचखोर तलाठ्यास न्यायालयाने ठोठावली चार वर्षाची शिक्षा व एक लाख दहा हजार रुपये दंड ; कुही तहसील कार्यालयात होता कार्यरत

लाचखोर तलाठ्यास न्यायालयाने ठोठावली चार वर्षाची शिक्षा व एक लाख दहा हजार रुपये दंड ; कुही तहसील कार्यालयात होता कार्यरत

कुही : शेतीचा सात-बारा नोंदणी करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने कुही तालुक्यातील तितूरचे तलाठी यांना चार वर्षांची शिक्षा तसेच एक लाख दहा हजारांचा दंड ठोठावला. सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी सोमवारी हा निर्णय दिला. संजय नत्थूजी राठोड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संजय राठोड कुही तालुक्यातील तितूर येथे तलाठी पदावर कार्यरत होता.

कुही तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन मुलांच्या नावावर शेतजमीन करण्यासाठी वाटणीपत्र तयार केले. या वाटणीपत्राप्रमाणे तितूर येथील तलाठी कार्यालयात जाऊन सात-बारामध्ये फेरफारसाठी अर्ज केला. आरोपी संजय राठोड यांनी यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली. आरोपीने सुरुवातीला २२ हजार रुपयांचीच लाच घेतली आणि नंतर उर्वरित ८ हजार रुपये देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारताना आरोपीला, लाच प्रतिबंधक विभागाने अटक केली.

सत्र न्यायालयाने सर्व पुराव्यांच्या आधारावर आरोपीला दोषी करार दिले आणि चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय आरोपीवर. एकूण एक लाख दहा हजारांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षेबाबत न्यायालयाने आदेशात सांगितले.चंद्रशेखर बहादुरे यांनी तपास केला.न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने अॅड. लीलाधर शेंद्रे यांनी बाजू मांडली.