नागपूर : उभ्या ट्रकवर धडकला टँकर, क्लीनरचा मृत्यू ; समृद्धी महामार्ग बनला मृत्यूमार्ग

नागपूर : उभ्या ट्रकवर धडकला टँकर, क्लीनरचा मृत्यू ; समृद्धी महामार्ग बनला मृत्यूमार्ग

 नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यात आता पुन्हा एकदा या मार्गावर अपघाताची घटना समोर आली. मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर कॉक्रीट टँकर धडकला. यात टँकरच्या क्लीनरचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. सतीशसिंग विजयसिंग (वय 37) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रामचंद्र पाल (वय 36) असे टँकरचालकाचे नाव आहे. जखमी रामचंद्र याला उपचारासाठी एम्समध्ये भरती करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान रहिवासी राजनसिंग (वय 42, ट्रक क्र. एमएच-40/सीडी-5658) ट्रक घेऊन वर्धा येथून नागपूरकडे येत होता. दरम्यान, ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने राजनसिंगने ट्रकला रस्त्याच्या कडेला पार्क केले. दरम्यान सतीश आणि रामचंद्र (टँकर क्र. एमएच 15/एचएच-5391) ने नागपूरकडे येत होते. रामचंद्रला झोपेची डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिली. यात क्लीनर सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली.

दरम्यान, रामचंद्रला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यानंतर क्रेनच्या मदतीने वाहनांना रस्त्याच्या कडेला करण्यात आले. रामचंद्र याला झोपेची डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.