सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करीत दरोडेखोरांनी केली सव्वा कोटीची लुट
नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाकबंगला गावातील सराफा व्यापारी पुतण्यासह कारने घरी जाताना चार दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करुन किलोभर सोन्यासह १ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली. कोराडीतील नांदा गावात राहणारे रवी मुसळे यांचे पिपळा डाकबंगला येथे बाजार चौकात निहारिका ज्वेलर्स नावाने सोन्याचांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे.
रात्री रवी मुसळे यांनी दुकान बंद केले. त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत ठेवले. रवी शटर बंद करीत असताना मयंकने बॅग कारमध्ये ठेवली. दोघेही कारमध्ये बसले आणि तेवढ्याच अचानक चार दरोडेखोर आले. त्यांनी रवी यांना पकडून मारहाण केली आणि मयंकने प्रतिकार करताच त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने गोळी हवेत उडाली. त्यानंतर मयंकच्या डोक्यावर पिस्तुलच्या मुठीने हल्ला केला. त्यात मयंक जखमी झाला. दोघांनाही कारमधून बाहेर फेकून आरोपींनी कारसह १ किलो सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व एक लाख २५ हजार रुपये रोख असा एकुण १ कोटी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला.

दरोडा घातल्यानंतर आरोपींनी नागपूरच्या दिशेने पळ काढला. पाटणसावंगी-बैलवाडा परिसरात आरोपींनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि दुसऱ्या कारने पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींनी पळवलेली कार जप्त केली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.


