हनीट्रॅपमध्ये अडकवून अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत युवकाकडून ५० लाख उकळले
नागपूर : समाज माध्यमातून ओळख झालेल्या काही युवतींनी एका २४ वर्षाच्या युवकाला जाळ्यात ओढून त्याला अश्लिल छायाचित्र पाठवले. त्यालाही फोटो पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर नग्न अवस्थेतील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची भीती दाखवून पैसे देण्यास भाग पाडले. घाबरलेल्या युवकाला बदनामीच्या भीतीपुढे काही सुचेनासे झाले. मागितलेले पैसे दिल्यास प्रकरण थांबेल म्हणून तो पैसे देत राहीला, अवघ्या चार महिन्यांत त्याने आरोपींना ५० लाख रुपये दिले. त्यानंतरही त्याला धमकाविणे सुरूच असल्याने अखेर युवकाचा नाईलाज झाला आणि सर्व प्रकार पुढे आला.
सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारा मंगेश (काल्पनिक नाव) हा खासगी काम करतो. मोबाईल हाताळत असताना ५ जानेवारीला त्याची एका युवतीशी ओळख झाली. तिने मंगेशला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संदेश पाठवत गृपशी जोडले. अचानक युवती ही त्याला ‘न्यूड व्हिडीओ कॉल’ करायला लागली. अश्लिल संभाषण करू लागली. या सर्व घटना मंगेशसोबत अचानक घडत होत्या. त्याला काही सुचायच्या आत वेगवेगळ्या मुली ‘न्यूड व्हिडीओ कॉल’ करू लागल्या. हळूहळू मंगेश देखील त्यात वाहवत गेला. संभाषणाला उत्तर देऊ लागला आणि जाळ्यात अडकत गेला. मंगेशनेही असेच काही छायाचित्र पाठविले. छायाचित्र हाती लागल्यानंतर तरुणींनी खरे रुप दाखवले. विविध अडचणी सांगून आरोपी युवती मंगेशकडून पैसे मागायच्या. पैसे न दिल्यास छायाचित्र समाज माध्यमांवर टाकून बदनामी करण्याची धमक्या देत होत्या. घाबरलेल्या मंगेशला आई-वडिलांना कळेल तर काय होईल ? अशी भीती वाटू लागली.

एकदाच मागितलेले पैसे देऊन टाकू आणि मोकळे व्हायचे असा निर्णय त्याने घेतला. सुरूवातीला मागितलेली रक्कम दिली. परंतु, तरुणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. वेळोवेळी त्याला धमकावत त्या पैसे उकळायच्या. अवघ्या चार महिन्यांत त्यांनी मंगेशकडून ५० लाख उकळले. पुन्हा पैसे देण्यास मंगेशचा नाईलाज झाल्याने त्याने वडिलांना सर्व प्रकार सांगिल्यानंतर वडिलांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ३१८, ३५१ (४), ३ (५), सहकलम ६६ (ड) आयटी अक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.


