नागपूरात परदेशी महिलांद्रारे सुरु असलेल्या हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश ; हॉटेल चालक महिलेवर गुन्हे शाखेची कारवाई

नागपूरात परदेशी महिलांद्रारे सुरु असलेल्या हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश ; हॉटेल चालक महिलेवर गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर : शहरातील मध्यवर्ती भागातील सेंट्रल एव्हेन्यूवरील प्रसिद्ध हॉटेल पॅराडाईजमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे. या कारवाईत उझबेकिस्तानमधून आलेल्या परदेशी महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली आहे. हॉटेलची चालक आणि मालक असलेल्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल पॅराडाईजवर छापा टाकला असता, आरोपी महिलेचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तपासादरम्यान पोलिसांना या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅटमधून महत्त्वाची माहिती मिळाली.

दिल्लीतील कृष्णकुमार उर्फ राधे देशराज या व्यक्तीच्या माध्यमातून परदेशी महिलांना नागपुरात पाठविण्याचे आणि त्यांचाकडून देहव्यापार करण्याचे मोठे जाळे उभे केले जात असल्याचे उघडकीस आले. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव रश्मी आनंद खत्री (वय ४९, रा. गोविंदगड, उप्पलवाडी) आहे. काही वर्षांपूर्वी त्या हॉटेल पॅराडाईजमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. पण काही महिन्यांपूर्वी तिने हे हॉटेल मूळ मालकाकडून भाड्याने चालवण्यासाठी घेतले. त्यानंतर तिने दिल्लीतील कृष्णकुमार उर्फ राधे देशराज यांच्याशी संपर्क साधून हॉटेलमधून देहव्यापाराचा व्यवसाय सुरू केला. पोलीस तपासानुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार, परदेशातील महिलांना नागपुरात बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार घडवून आणण्यात येत होता. यासाठी मुख्यतः व्हॉट्सॲप चॅटचा वापर करून व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून हॉटेल पॅराडाईजच्या चौथ्या मजल्यावरील रूम क्रमांक ४०३ मध्ये छापा टाकला. यावेळी उझबेकिस्तान येथून आलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल, व्हॉट्सॲप चॅटमधील संभाषणे, तसेच अन्य पुरावे जप्त केले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार कृष्णकुमार उर्फ राधे देशराज सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात पीटा आणि विविध कलम अंतर्गत अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.