लग्न समारंभ आटोपून घरी येताना काळाने घेरलं ; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, एक जखमी

लग्न समारंभ आटोपून घरी येताना काळाने घेरलं ; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, एक जखमी

नागपूर : सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संविधान चौकात भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने भाऊ-बहीण ठार तर अन्य एक जखमी झाला. रुद्र सुनील सिंगलधुपे (वय ११) व त्याची बहीण सिमरन सुनील सिंगलधुपे (वय १२) अशी मृतांची नावे आहेत. शेषनाथसिंग जागेश्वरसिंग (वय ५६, सर्व मूळ रा. दोन्ही मूळ रा. बालाघाट, मध्य प्रदेश, सध्या रा. केजीएन सोसायटी, काटोल रोड) असे जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कामठी येथे शेषनाथसिंग यांच्या नातेवाइकाचे लग्न होते. या लग्नाला जायचे असल्याचा हट्ट रुद्र व सिमरनने धरला. त्यामुळे शेषनाथसिंग हे दोघांना एमएच-३१-एफके-१८११ या क्रमांकाच्या मोटारसायकलने घेऊन कामठी गेले. लग्न आटोपून रात्री १०.३० वाजताचा सुमारास ते दोघांसह मोटारसायकलने घरी जात होते. संविधान चौकात मागाहून भरधाव आलेल्या एनएल-०१-एजी-०८६८ या क्रमांकाच्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिली यात तिघेही जखमी झाले. रुद्र याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला.

पोलिसांनी सिमरनला मेयो हॉस्पिटलमध्ये तर शेषनाथसिंग यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान सिमरनचा मृत्यू झाला. शेषनाथसिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर फरार ट्रकचालक सहेंद्र पंचम बिन (वय ३७, रा. मिर्झापूर) याला सीताबर्डी पोलिसांनी शोध घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला.