छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला; 9 जवान शहीद

छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला

 9 जवान शहीद

 रायपूर :  छत्तीसगडमधील बिजापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिजापूरमध्ये जिल्हा राखील दलाच्या जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. शोध मोहिमेनंतर पोलिसांचे पथक नारायणपूरहून परतत असताना आठ जवान आणि एक चालक शहीद झाला आहे. दुपारी 2:15 वाजता नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. शहीद झालेले सर्व जवान डीआरजीचे आहेत. या घटनेत ५ जवान जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांचे मृतदेहही पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

विजापूरमधील या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. सोमवारी कुत्रू भागात नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या वाहनाला लक्ष्य केले.  वाहनावर आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवानही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. बस्तर रेंजच्या आयजींनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

जिल्हा राखील दलाचे सैनिक मोहिमेसाठी निघाले असताना ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी हा हल्ला कसा केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, या घटनेने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. यापूर्वी शनिवारीही अबुझमदच्या जंगलात चकमक झाली होती. या चकमकीत डीआरजीचे जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. त्याचवेळी सुरक्षा दलांनी एका महिला नक्षलवाद्यांसह 4  नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. अलीकडच्या काळात सैनिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. इतर ठिकाणांहून जवानांच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. ही घटना कुत्रु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेली गावाजवळ घडली.

या घटनेबाबत छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष रमण सिंह म्हणाले की, जेव्हा जेव्हा नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जाते तेव्हा ते अशी भ्याड कृत्ये करतात. छत्तीसगड सरकार नक्षलवादाच्या विरोधात उचलत असलेली पावले अधिक तीव्र करेल. सरकार घाबरणार नाही, झुकणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई सुरूच राहील.

  • 3 दिवसांपूर्वी गरीयाबंदमध्ये 3 नक्षलवादी ठार

तीन दिवसांपूर्वी गरीयाबंद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सोरनामल जंगलात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) आणि एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) पथकांनी ही मोहीम पूर्ण केली. छत्तीसगड आणि ओडिशातील सुमारे 300 सैनिक या कारवाईत सहभागी झाले होते. ओडिशातील नवरंगपूरलाही जवानांनी वेढा घातला होता, त्यामुळे नक्षलवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गरीबीबंदचे एसपी निखिल राखेचा यांनी याला दुजोरा दिला आहे