४ महिन्यांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलगी सापडली ; इंस्टाग्राम स्टोरी ठरली धागा
नागपूर : शहर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण रितीने तपास करत वाठोडा पोलीस हद्दीतून चार महिन्यांपासून बेपत्ता १५ वर्षीय मुलीचा शोध घेतला. तीन दिवसांपूर्वी एकाने मित्राच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देताना इंस्टाग्राम स्टोरीवर केलेली पोस्ट पोलिसांसाठी या अल्पवयीन मुलीला शोधण्यासाठी निर्णायक ठरली. मयूर रमेश वघरे (२२) रा म्हसगाव ता. गोरेगाव जि. गोंदिया असे अल्पवयीन मुलीला जाळ्यात अडकवून फूस लावत पळवून नेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून अटक केली. चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारे आरोपी वाय-फायच्या माध्यमातून इंस्टाग्राम वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान एका पोस्टवर पोलिसांचे लक्ष गेले. त्यावरील स्टोरी पाहून पोलिसांनी आरोपीच्या ओळखीतल्या एकाला विश्वासात घेत इंस्टाग्रामवर संपर्क साधण्यास सांगितले. पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. यामध्ये वाठोडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस यांनी मैत्रिणीची भूमिका स्वीकारली. पोलिसांनी एक बनाव निर्माण केला. त्यांनी आम्ही घरातून पळून आलो असून पोलिस मागे लागले आहेत, फक्त दोन दिवस लपण्यासाठी जागा हवी आहे. अशी भावनिक विनंती केली. सुरुवातीला आरोपी लोकेशन देण्यास टाळाटाळ करत होता. मात्र सतत संवाद साधल्याने त्याचा विश्वास बसला. हा प्रतिसाद मिळताच पोलिसांनी सापळ्याचा दुसरा अंक रचला. पोलिसांचे पथक ठरल्या प्रमाणे पुण्याकडे रवाना झाले. पुणे बस स्थानकावर आरोपीने १२ तास वाट पाहायला लावली. नंतर त्याने बारामती येथे येण्यास सांगितले. बारामती येथेही ६ तास प्रतीक्षा केल्यानंतर आरोपीने इंदापूरच्या भवानीनगर बस थांब्यावर बोलवले.

दरम्यान त्याने इंस्टाग्राम व्हिडिओ कॉल करून खात्री करून घेतली. पोलिसांनी एसटी बसमधून कॉल अटेंड करत भूमिका सफाईदारपणे निभावली. अखेर भवानीनगर येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सत्य उघड केले आणि पीडित १५ वर्षीय मुलगी आपल्या सोबतच असल्याचे सांगितले. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका करत पोलिसांनी कुटुंबियांचा स्वाधीन केले.







