अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीशी अश्लील चाळे; 58 वर्षीय नराधमाला अटक
नागपूर : अंगणात खेळत असलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीशी वस्तीतच राहणाऱ्या 58 वर्षीय नराधमाने अश्लील चाळे केले. नागरिक व नातेवाईकांनी नराधमाला पकडून चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे.
प्रदीप गोविंद देवकते असे अटकेतील नराधमाचे नाव आहे. आरोपी प्रदीप हा कोषागार विभागात कार्यरत होता. काही काळापूर्वी त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मानकापूर परिसरात राहतो. पीडित चिमुकली दुपारच्या सुमारास वस्तीतील इतर मुलांसोबत घराच्या अंगणात खेळत होती. या दरम्यान प्रदीप तेथे आला. त्याने लाड करण्याच्या बहाण्याने मुलीला कडेवर घेतले. तिच्याशी अश्लील चाळे केले आणि निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पीडित मुलीचे वडील जिमला जाण्यासाठी उठले. शेजारी झोपलेल्या मुलीच्या ओठांवर रक्त जमा असल्याचे दिसले. खेळता-खेळता पडली असावी हा विचार करून ते निघून गेले. घरी परतल्यावर त्यांनी पत्नीला पडल्याने चिमुकलीला काही दुखापत झाल्याबाबत विचारले. त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. तिने चिमुकलीला ओठांवरील दुखापतीबाबत विचारले असता तिने प्रदीपचे नाव सांगितले. याप्रकारानंतर पीडित बालिकेच्या आई-वडिलांना धक्काच बसला.
पोलिसांत तक्रार
याप्रकारानंतर आरोपी प्रदीप देवकाते याच्याविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रदीप देवकाते याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.


