खापरखेडा ; एटीएम मशीन घेऊन चोर फरार
खापरखेडा : भानेगाव टी पॉईंट पारशिवनी मार्गावरील एटीएम सेंटरमध्ये तीन चोरटे चक्क एटीएम मशीन घेऊन पळ काढल्याची घटना सकाळच्या सुमारास ५ वाजता उघडकीस आली. सदर घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनामूळे भानेगाव व खापरखेडा परिसरात दहशत पसरली आहे.
फिर्यादी निलेश प्रभू राऊत वय ३८ रा वार्ड नंबर ४ नविन भानेगाव यांचे भानेगाव टी पॉइंट पारशिवनी मार्गावर राऊत कॉम्प्लेक्स या नावाने तीन दुकाने आहेत. कॉम्प्लेक्स समोर वाकरंगी कंपनीची एटीएम मशीन असून, दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. घटनेच्या दिवशी ५ मार्च बुधवारला मध्यरात्री १.३० च्या सुमारास एटीएम दिसून आले. मात्र जवळपास २ वाजताच्या दरम्यान पारशिवनी मार्गाकडून पांढऱ्या रंगाची टाटा मॅक्स गाडी निलेश राऊत यांच्या कॉम्प्लेक्स जवळ येऊन थांबली.

यावेळी तीन अज्ञात चोरटे एटीएम मशीन जवळ आले तर, एक चोरटा वाहनात बसून होता सुरुवातीला अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन रूम व बाहेर लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर काळया रंगाच्या स्प्रे मारला. यावेळी कोपऱ्यात असलेला कॅमेरा बंद करण्यासाठी चोरांनी वायर कापला. मात्र तो वायर लाईटचा असल्यामूळे अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पहाटेच्या सुमारास भानेगाव पारशिवनी मार्गावर लहानमोठ्या वाहनांची वर्दळ होती.
मात्र, यावेळी अज्ञात तीन चोरट्यांनी वेळ साधून चक्क एटीएम मशीन उचलून टाटा मॅक्स गाडीत लोड करून घटनास्थळावरुन पारशिवनी तालुक्याच्या दिशेने पसार झाले. फिर्यादी निलेश राऊत मॉर्निग वॉकला जात असताना पहाटे ५ च्या सुमारास घटना उघडकीस आली . डायल ११२ क्रमांकावर फोन करून एटीएम मशीन चोरी झाल्याची माहिती दिली गेली . सदर घटनेची नोंद खापरखेडा पोलिसांनी केली असून, स्थानिक गुन्हे शाखा, पारशिवनी व खापरखेडा पोलीस शोधमोहिम राबवित आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये फिर्यादी निलेश राऊत यांनी वाकरंगी कंपनी कडून एटीएम मशीनची एजन्सी घेतली होती. एटीएम मशीन ट्रे मध्ये पैसे लोड करणे, मशिनची देखभाल दुरुस्ती करणे ही सेवा कमिशन तत्वावर निलेश राऊत देत होते. ४ मार्च मंगळवारला निलेश राऊत यांनी एटीएम मशीन ट्रेमध्ये १ लाख ७२ हजार रुपये लोड केले होते. बुधवार मध्यरात्री पर्यंत १ लाख २९ हजार ७०० रुपये ग्राहकांनी एटीएम मधून विड्रॉल केले होते. ४२ हजार ३०० रुपये एटीएम मशीन मध्ये शिल्लक होते. एटीएम मशीनची किंमत २ लाख १० हजार रुपये असून, एकूण २ लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.


