वीज कोसळून बैलजोडी ठार ; कुही तालुक्यातील घटना
(पत्रकार भास्कर खराबे)
कुही:- तालुक्यातील भोजापूर शेतशिवारात शेतात बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळल्याने बैलजोडी ठार झाली असून शेतमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास तालुक्यात ठिकठिकाणी वीजगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. यातच भोजापूर शेतशिवारातील रेखा विठोबा जिभकाटे यांची बुटी तलाव नजीक मुसळगाव रोडवर शेती असून त्यांनी शेतात बैलजोडी बांधली होती. दुपारी 2.30 च्या सुमारास बैल जोडीवर वीज कोसळून दोन्ही बैल जागीच ठार झाले आहे. एन हंगामावर बैलजोडीवर वीज पडून बैल ठार झाल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असून त्यात शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आठवडाभरावर पेरणी येऊन ठेपली असून बैलजोडीच नाही तर शेती करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला असून शासनातर्फे तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी महिला रेखा विठोबा जीभकाटे यांनी केली आहे.



