उड्डाणपुलावरून उडी घेत होमगार्डने संपवलं जीवन ; नागपुरातील मानकापूर परिसरातील घटना
नागपूर : शहरातील मानकापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्रीडा संकुलासमोर सोमवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. यशवंत रमेश शाहू (वय अंदाजे 30), असं या मृत व्यक्तीचे नाव असून त्याने मानकापूर उड्डाणपुलावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, यशवंत शाहू यांनी आपली दुचाकी उड्डाणपुलावर उभी केली आणि काही वेळ तिथेच उभा राहिला. त्यानंतर अचानक त्याने अचानक उड्डाणपुलावरून उडी घेतली. पुलावरून खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. लगेचच त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृतक यशवंत शाहू हे जरीपटका परिसरातील कुकरेजा नगरमध्ये राहत होता. तो नागपूर होमगार्ड विभागात कार्यरत होता तसेच मेस्को या खासगी संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत होत. त्याची कोणतीही आत्महत्येपूर्व चिठ्ठी मिळालेली नाही. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी उड्डाणपुलासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.


