रिव्हर्स घेताना ट्रॅक्टर मजुराच्या अंगावरच गेला ; अपघात झाला अन् मृत्यू ओढवला

रिव्हर्स घेताना ट्रॅक्टर मजुराच्या अंगावरच गेला ; अपघात झाला अन् मृत्यू ओढवला

चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथून जवळच असलेल्या अरेर नवरगाव येथे रेतीघाटावर ट्रॅक्टर मागे घेताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे मजुराच्या अंगावरून गेला. यात मजूर जखमी होऊन मृत्यू झाला. अभय श्रीराम भानारकर (वय ३२, रा. पवनी) असे मृत मजुराचे नाव आहे. तर टिंकू एकनाथ भागडकर (वय ३२, रा. अरेर नवरगाव) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

सय्यद हव्यात अली यांनी ब्रह्मपुरी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, नवरगाव येथील अनूज कुमार अग्रवाल यांच्या रेतीघाटावर त्यांच्या गावातील अभय श्रीराम भानारकर हा ट्रॅक्टर भरण्यासाठी मजुरीवर आहे. सध्या घाटावरून रेती काढण्याचे काम बंद असल्याने साठवणूक केलेली रेती टॅक्टरमध्ये भरून ती पुरवण्याचे काम करतो. अभय भानारकर हा रेतीचे ट्रॅक्टर रिव्हर्स घेण्याकरिता ट्रॅक्टर चालकास साईड दाखवण्याचे काम करत होता. त्यावेळी तो निळ्या रंगाचे विना क्रमांकाचा ट्रॅक्टर टिंकू एकनाथ भागडकर हे चालवत होते.

ट्रॅक्टर चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून साईड दाखविणाऱ्या अभय भानारकर ट्रॅक्टर टॉलीने धडक देऊन गंभीर दुखापत केली. त्यास उपचारास उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेले असता येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत ब्रह्मपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.