आठवडी बाजारांत मोबाईल चोरांचा सुळसुळाट ;
ग्राहक असल्याचे भासवून करतात चोरी.
कुही :- तालुक्यातील प्रमुख आठवडी बाजारांत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. ग्राहक असल्याचे भासवून ग्राहकांच्या खिशातून मोबाईल चोरणारी हि टोळी तालुक्यात सक्रीय झाली आहे.
तालुक्यातील कुही , मांढळ या प्रमुख आठवडी बाजारांतून मोबाईल चोरीला जाण्याची संख्या दिवसागणिक वाढतीवर आहे. त्यात कुही शहरातील शारदा चौक, वीर शिवाजी चौक व बाजार चौक या दरम्यान दर बुधवारी भरणारा आठवडी बाजारातून बाजारात मोबाईल चोरीच्या संख्येत वाढ झाली आहे. हे चोरटे लोकांच्या हातावर तुरी देऊन अनेकांचे मोबाईल लंपास करीत आहेत. कुही शहर लगतचे अनेक गाव खेड्यातील लोक भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी मोठ्या संख्येने कुही येथील आठवडी बाजारात येत असल्याने बुधवारी शहरात मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे दुपारी 4 ते 6 च्या सुमारास मोठी गर्दी होत असून याच गर्दीचा फायदा घेत काही भुरटे चोर भाजीपाला घेण्यास मग्न असलेल्या नागरिकांच्या खिशातून मोठ्या शेताफीने मोबाईल काढत पळ काढण्यात यशस्वी होत आहेत.गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात दोन ते तीन मोबाईल चोरी जात असल्याच्या घटना घडल्या असून यामुळे अनेकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे ज्यांचे मोबाईल चोरी गेले त्यापैकी काही लोक याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात तर काहीजण तक्रारही करत नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा कुही पोलिसांनी ह्या मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्राहक असल्याचे भासवून करतात चोरी.
ह्या चोरांनी मोबाईल चोरीसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. ज्या भाजीच्या दुकानावर ग्राहकांची जास्त गर्दी असते त्या दुकानात ग्राहक असल्याचे भासवतात. व नजीकच असलेल्या व भाजीपाला घेण्यासाठी खाली बसलेल्या ग्राहकाच्या वरच्या खिशात असलेला मोबाईल मोठ्या शिताफीने काढून घेत तेथून पळ काढण्यात यशस्वी होतात.