आजाराला कंटाळून वृद्धेची विहरीत उडी घेत आत्महत्या

आजाराला कंटाळून वृद्धेची विहरीत उडी घेत आत्महत्या

कुही : शहरातील वार्ड क्र. ६ येथे राहणाऱ्या शेवंताबाई सिताराम शेंडे (वय ७०) यांनी दम्याच्या आजाराला कंटाळून घराशेजारील जुन्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली.

शुभम राजु शेंडे (वय २७, नातू) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शेवंताबाई यांना काही दिवसांपासून दम्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे तब्येत बिघडलेली असायची. त्या वारंवार मोहल्ल्यातील महिलांना आता हा त्रास सहन होत नाही मरण आलं तर बरे होईल असे सांगत असत. आज सकाळी शुभम सेंट्रिंगचा कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी जेवण करायला आले असता दुपारी अंदाजे १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या मोठ्या आई माया शेंडे यांनी घरात येऊन क्षीरसागर यांच्या घराजवळील जुन्या विहिरीत एक म्हातारी बाई पडलेली दिसत आहे अशी माहिती दिली. त्यानंतर शुभम व परिसरातील नागरिक तिथे गेले असता विहिरीत शेवंताबाई तरंगताना दिसल्या.

घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पुढील तपासासाठी शेवंताबाई यांना ग्रामीण रुग्णालय कुही येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोउनी चांगदेव कुथे सहित पोशी आशिष खंडाईत करीत आहे.