वडील रागावल्याने लेकाचा राग अनावर ; जन्मदात्या आईसमोर बापाला संपवलं

वडील रागावल्याने लेकाचा राग अनावर ; जन्मदात्या आईसमोर बापाला संपवलं

नागपूर : मद्यधुंद मुलाने चाकूने वार करून आईसमोरच वडिलांचा खून केला. ही थरारक घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंडकापार येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मुलाला अटक केली. भाऊराव गोविंदा मांढरे (वय 78), असं मृतकाचं तर रवींद्र उर्फ रवी भाऊराव मांढरे (वय 33), असं अटकेतील मारेकरी मुलाचं नाव आहे.

रवी याला दारूचे व्यसन आहे. तो काम करीत नाहीत. रात्री ८ वाजता रवी हा दारू पिऊन घरी आला व खोलीत झोपला. यादरम्यान भाऊराव, रवीची आई मैनाबाई (वय 68) रवीची पत्नी भारती यांनी जेवण केले. ‘रवी याला नवीन जाळं व नवीन नाव घेऊन दिली. तरी तो काम करीत नाही. सतत दारू पिऊन बडबड करतो’, असं भाऊराव त्याला उद्देशून म्हणाले. त्यामुळे रवी संतापला. दरम्यान, रात्री ९ वाजता भाऊराव हे बाजेवर झोपले. मैनाबाई या पलंगावर नातवासोबत झोपल्या. रवी उठला आणि त्याने चाकूने भाऊराव यांच्या शरीरावर सपासप वार करायला सुरूवात केली. आवाजाने मैनाबाई उठल्या. त्यांनी रवीला मनाई करताच रवी पसार झाला. मैनाबाई यांनी आरडाओरड केली. शेजारी जमले पण तोपर्यंत भाऊराव यांचा मृत्यू झाला होता.

शेजाऱ्याने रामटेक पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. शोध घेऊन पोलिसांनी रवी याला अटक केली.